औरंगाबाद प्रतिनिधी | चेंबूर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर चार जणांनी ७ जुलै रोजी सामूहिक अत्याचार केला होता. या पीडितेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिस गुरुवारी रात्री शहरात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून अद्याप पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नाही.
जालना जिल्ह्यातील पीडित तरुणी तिच्या भावासह मुंबईतील चेंबूर भागात राहत होती. मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून ती ७ जुलै रोजी घराबाहेर पडली. परंतु, चार जणांनी तिच्यावर चेंबूरच्या लाल डोंगर भागात बलात्कार केला होता. तिला उपचारांसाठी औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रचंड मानसिक धक्का बसल्यामुळे तिचा दीड महिन्यानंतर; बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे पीडितेच्या कुटंबीयांना न्याय मिळावे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपिंना फाशीचीच शिक्षा होणार अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.