नवी दिल्ली : लोकसभेतील कामगिरीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. लोकसभेतील महत्वाच्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंचा कायम सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कामगिरीत अजून एका विक्रमाची भर पडली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ या संस्थेने केलेल्या पाहणीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे दुसरे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले असून ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे.
प्रश्न विचारणे माझे कर्तव्य
संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर २०१९ या काळात सुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले तर विविध राष्ट्रीय विषयांवरील ७५ चर्चांमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना राज्यातील जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न त्या नेहमीच हिरीरीने संसदेत मांडत आल्या आहेत. याबाबत विचारले असता ‘सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच प्रश्नोत्तराच्या तासाच मी सर्वात जास्त सक्रिय असते’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती मतदारसंघातून त्या सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.