श्रीनगर : हिदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट असणारी अमरनाथ यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मुत रवाना झाली आहे. भगवतीनगर बेस कॅम्पमधून आज यात्रेला सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरचे मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रमण्यम, जम्मु काश्मिरच्या राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि बी. बी. व्यास आदींनी यात्रेकरुंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. आज सुरु झालेली यात्रा २६ आॅगस्ट रोजी संपणार आहे. यंदा अमरनाथ यात्रमधे १९०૪ भाविकांनी सहभाग घेतला आहे. त्यामधील १५५૪ पुरुष तर ३२० महिला आहेत. तसेच यात्रेमधे ३० मुले आहेत. अमरनाथ यात्रेला सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त असून यावेळी प्रथमच महिला सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.