पुणे | समिर रानडे
स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असून यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची संख्या वाढत आहे. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये साहसी पर्यटन, खाद्य संस्कृती, नवीन स्थळे व अनुभव हे लोकांसमोर आणण्याचा स्वित्झर्लंड टूरिझम प्रयत्न करत आहे. ऑगस्ट 2016 मध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याची ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली व त्याच्याबरोबर सुरू केलेल्या मोहिमेमुळे येणार्या पर्यटकांच्या संख्येवर चांगला प्रभाव पडला. 2017 मध्ये भारतीयांनी स्वित्झर्लंडमध्ये केलेल्या पर्यटनासाठी अनुभवलेल्या दिवसांमध्ये (ओव्हरनाईट स्पेंट) 23.4 टक्क्यांनी वाढ झाली व यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 10 टक्के वाढ झाली आहे,ही माहिती स्वित्झर्लंड टूरिझम तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत स्वित्झर्लंड टूरिझमचे भारतातील संचालक क्लाऊडीओ झेंप आणि स्वित्झर्लंड टूरिझम इंडियाच्या उपसंचालिका रितु शर्मा यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना रितु शर्मा यांनी भारतीय पर्यटकांचे काही कल सांगितले.त्या म्हणाल्या की,भारतीय पर्यटक फक्त हॉटेलमध्येच नव्हे तर अपार्टमेंटमध्ये राहायला देखील पसंती देत आहेत. भारतातून स्वित्झर्लंडला सर्वाधिक पर्यटक हे पश्चिम भागातून म्हणजेच महाराष्ट्र व गुजरातमधून येतात. फक्त निसर्ग पाहण्यासाठी नव्हे तर साहसी पर्यटन व इतर अॅक्टिव्हिटीजसाठी देखील पर्यटक स्वित्झर्लंडला जात आहेत. त्याशिवाय तेथे जाऊन फक्त भारतीय पदार्थ नव्हे तर तेथील स्थानिक पदार्थांचा देखील पर्यटक आनंद लुटत आहेत.एरवी स्थिरस्थावर झालेले म्हणजेच 30 ते 55 वयोगटातील लोकं स्वित्झर्लंडला जायचे,मात्र आता तरूण पिढीच्या वाढत्या उत्पन्नामुळे तसेच रिटायर्ड लोकांमध्ये देखील स्वित्झर्लंड पाहण्याची रूची असल्यामुळे सर्वच वयोगटातील लोकं स्वित्झर्लंडला पसंती देत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की,एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडची प्रतिमा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून पर्यटकांना विविध पर्यायांबाबत माहिती देत आहेत.त्यामध्ये सेंट मॉरिटस येथील हिवाळ्यातील गोठलेल्या तलावावर आईस क्रिकेट गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आले असून पहिल्या आईस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वीरेंद्र सेहवाग,लसिथ मलिंगा,झहीर खान,महंमद कैफ अशा अनेकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
याप्रसंगी बोलताना स्वित्झर्लंड टूरिझमचे भारतातील संचालक क्लाऊडीओ झेंप म्हणाले की,ब्रँड अॅम्बेसिडर रणवीर सिंग सोेबत आम्ही स्वित्झर्लंडमधील साहसी पर्यटन,क्रीडा संस्कृती,नवीन स्थळे व अनुभव लोकांपर्यंत पोहचवित आहोत.इंटर लाकेन ते माँट्रीयाक्स दरम्यानच्या ट्रेनला रणवीर सिंग ट्रेन (तात्पुरते)असे नाव दिले गेले आहे.तसेच स्वित्झर्लंड मध्ये चार्ली चाप्लीन चे तब्बल 20 वर्ष वास्तव्य होते.त्यांच्या येथील घराचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.पर्यटकांनी सर्व मौसमांचा खास करून हिवाळ्याचा अनुभव येथे घ्यावा व झ्युरिक सारखी मोठी शहरे नव्हे तर छोटी शहरे व गावांमध्ये देखील पर्यटनाचा अनुभव घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
रितु शर्मा म्हणाल्या की, स्वित्झर्लंड हे 365 दिवसांचे पर्यटन स्थळ असून पयर्र्टकांचे वर्षात कधीही स्वागत करण्यास आम्ही तयार आहोत.स्विस ट्रॅव्हल पासमुळे पर्यटकांना अधिक सोय होणार आहे.या एकाच तिकीटामध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा उपभोग घेता येणार आहे.त्याचबरोबर स्विस इंटरनॅशनल एअरलाईन्सने नुकताच स्टॉपओव्हर स्वित्झर्लंड प्रोग्राम सादर केला आहे.ज्यामुळे पर्यटकांना एका स्थळावरून दुसर्या स्थळाकडे जाताना स्वित्झर्लंडला थांबून 1 ते 4 दिवसांचा पर्यटनाचा चांगला अनुभव मिळू शकेल.