हिंगोली प्रतिनिधी | हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात येत असलेल्या पिंपळदरी गावाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले मुगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातचे गेले आहे. तसेच कापूस सोयाबीन या पिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं इतक्या दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असणारा मराठवाड्यातील शेतकरी हा आता पुरता वैतागून गेलाला दिसतो आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या सोणवाडी पुलावरील रस्ता देखील पावसाच्या पाण्यान वाहून गेल्यान राजदरी, सोनवाडी या गावांचा रात्री पासून संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वरुणराजान पाठ फिरविली होती, मात्र काल अचानक आलेल्या पावसान जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या तर, पिंपळदरी , सोनवाडी कंजारा, राजदरी या गावासह इतर दहा गावांना अक्षरशः पावसान झोडपून काढले. मोठ्या विश्रातीनंतर पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली. पण काही भागात फक्त रिमझिम पाऊस पडला. आठ जिल्ह्यांतील 421 मंडळांपैकी 16 मंडळांत जोरदार पावसाची नोंद झाली.