जालना ता.११ : मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गारपीटीने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजत आहे.
सकाळी झालेल्या गारांच्या पावसामुळे काहीकाळाकरीता जालना आणि परिसराला जम्मू कश्मिरचे रुप आले होते. जालना, वाशिम, बुलडाणा, अकोला आणि बीडमध्ये गारपिटीसह पाऊस पडला. जालन्यात १५ मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गहू, हरभरा, द्राक्षे, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले. अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस कोसळला. रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. बीड जिल्ह्यातील अनेक भागांत गारा आणि पाऊस पडला. धुळे शहरात पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद, महागाव आणि बेलखेड परिसरात गारपीट झाली. बुलडाण्यालाही गारांनी तडाखा दिला.