मध्यप्रदेशच्या ३ विजयी आमदारांचं सातारा कनेक्शन – निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | योगेश जगताप

राजकारण म्हटलं की पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी प्रामुख्याने येतात. कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात, पाठपुरावा करतात, मोर्चे-आंदोलने यशस्वी करतात, प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संवाद साधतात. काही वेळेला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यालाच त्या मतदारसंघाची माहिती चांगल्या पद्धतीने झालेली असते. अनेक अडचणी व उपेक्षांचा सामना करत हे कार्यकर्ते धडपडतच असतात. अचानक एखादा दिवस असा येतो की त्या धडपडीचं सार्थक होतं. केवळ पद आणि पैसा डोळ्यासमोर न ठेवताही ज्यावेळी तुमच्या कामाची दखल घेतली जाते, आणि तुमच्यावर दाखवलेला विश्वास तुम्ही सार्थ करुन दाखवता त्यावेळी तुमच्या आनंदाला समाधानाचं कोंदणही आपोआप मिळतं.    

           श्री नाझीम इनामदार, साताऱ्यातील पळशी स्टेशन हे त्यांचं छोटंसं गाव..कोरेगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना एकदिवस अचानक त्यांना ई-मेल येतो आणि त्यांना बोलावलं जातं – थेट मध्यप्रदेशला – विधानसभा निवडणुकीच्या ३ जिल्ह्यातील ४ मतदारसंघात काम करायला.. सातारा जिल्ह्यातून निवड झालेले नाझीम हे एकमेव कार्यकर्ते होते. मध्यप्रदेशात जाऊन  त्यांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत तीन उमेदवारांना निवडून यायला त्यांनी हातभार लावला. विशेष म्हणजे त्यांनी प्रचार केलेल्या २ उमेदवारांनी पूर्व सरकारमधील (भाजप) कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केलेला आहे. एकूणच स्वप्नवत वाटावा असा हा दीड-दोन महिन्यांचा कालावधी.. एका निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती.

       एकूण देशातच काँग्रेसची वाताहत झालेली असताना मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांतील निवडणूक निकालांनी काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिली आहे. त्यामध्ये नाझीम इनामदार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. मध्यप्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल चौधरी व मध्यप्रदेश काँग्रेसचे विधानसभा निवडणुक प्रभारी हरीश पवार यांच्या विनंतीला मान देऊन श्री नाजीम यांनी ३ जिल्ह्यातील ४ मतदारसंघात काम करायचं ठरवलं. शाहपूर (दिंडोरी), मनगवा (रिवा), जबलपूर (पूर्व), जबलपूर (बर्गी) या चार मतदारसंघातील प्रस्थापित चार भाजप उमेदवारांना जेरीस आणण्याचं काम इनामदार यांच्या टीमने केलं. यापैकी जबलपूर पूर्व मधून लखन घंघोरीया व बर्गी मधून संजय भैया यादव यांनी तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवला. भूपेंद्र मरावी हेसुद्धा एका जागेवर विजयी झाले आहेत. एका जागेवर पराभूत झालेल्या काँग्रेसच्या महिला उमेदवाराने २०१३ सालच्या ५४ हजार मताधिक्य मिळवलेल्या उमेदवाराचे मताधिक्य जवळपास ४० हजारांनी कमी केले. एकूणच आश्वासक कामाच्या नियोजनावर अल्प कालावधीत त्यांनी या यशाला गवसणी घातली. पूर्वीपासून संघटनात्मक कामावर भर असल्यामुळे या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती केली. सहकाऱ्यांनी तळमळीने काम केल्यामुळेच हा विजय मिळाला असल्याचं मत नाजीम इनामदार यांनी व्यक्त केलं. कोरेगाव तालुक्याचे भाग्यविधाते शंकरराव जगताप आणि लोकनेते इसाक पट्टू इनामदार यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असून त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकलो अशी प्रांजळ कबुलीही श्री नाझीम इनामदार यांनी दिली.

           राहुल गांधी सध्या युवकांमध्ये नवीन प्रयोग करण्याच्या विचारात आहेत. कार्यकर्त्यांच्या कामाचा तपशील ऑनलाईन नोंद करुन ठेवला जात असतानाच कोरेगाव तालुक्यात केलेल्या कामाचं बक्षीस श्री इनामदार यांना मिळालं. इतर राज्यांत काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांकडेही लक्ष दिलं जात असल्याचं पुढे इनामदार म्हणाले. ५ राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या समस्यांवर व युवकांच्या रोजगारावर ठोस उपाययोजना करण्यासाठीही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासंदर्भातील एक विशेष बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली, ज्यात श्री नाझीम इनामदार यांनीही सहभाग नोंदविला.

त्यांच्या भरीव योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(बाबा), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, माजी आमदार मदनदादा भोसले, माण-खटाव तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, विधानपरिषद सदस्य आनंदराव पाटील(आबा), आमदार विश्वजीत कदम, स्वराज्य संस्थेचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, सह्याद्री बँकेचे चेअरमन व उद्योजक पुरुषोत्तम माने व इतर काँग्रेस सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

कोण आहेत नाझीम इनामदार??

१) सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन गावचे रहिवासी

२) लोकनेते स्व. इसाक पट्टू इनामदार यांचे पुतणे

३) काँग्रेसचे निष्ठावान व कट्टर कार्यकर्ते

४) ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागील १५ वर्ष सक्रिय काम, तसेच विकास सेवा सोसायटीत चेअरमन म्हणून काम पाहिलं आहे.

५) कोरेगाव तालुका काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून कार्यरत

६)  मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत ३ जिल्ह्यांचे काँग्रेस प्रभारी म्हणून काम

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

Leave a Comment