कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गावातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्यात शेतकरी, ग्रामस्थांना या ठिकाणासून प्रवास कराताना खूप अडचणी येत आहेत. या पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी देण्याची मागणी केली असता मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत दक्षिण मतदार संघातील 28 गावातील 43.50 कि.मी. पाणंद रस्त्यांना 10 कोटी 44 लाख इतका भरघोस निधी मिळाला आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाणंद रस्त्यांना राज्य शासनाकडून निधी दिला जातो. यासाठी कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार 43.50 कि.मी. एवढ्या अंतराच्या पाणंद रस्त्यांना जवळपास 10 कोटी 44 लाख इतका भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये गोटे येथे एनएच 4 हायवे ते महादेव मंदिर व स्मशानभूमीकडे जाणारा पाणंद रस्ता रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे चचेगाव येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यापासून शामराव पवार यांचे शेतापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, तुळसण येथे जुगाई मंदिर ते देशपांडे शिवार (येळगांव हद्द) पाणंद रस्ता व स्मशानभूमी ते कुंभारकी पाणंद रस्ता मजबूतीकरण व खडीकरण व डांबरीकरण करणे, आटके येथे अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे याचा समावेश आहे.
तर किरपे येथील देवकर मळ्यात जाणारा पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जिंती येथील चव्हाण मळा येथील पाणंद रस्ता करणे, कार्वे येथील अंतर्गत पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे यासह खोडशी, शेरे विंग, वाठार, नांदगाव, येणपे, शेरे, धोंडेवाडी, नांदलापूर, नारायणवाडी, ओंडशी, पाचुपतेवाडी, पोतले, सवादे, टाळगाव, वडगाव हवेली, वहागाव, वारुंजी, कापील अशा कराड दक्षिण मधील 28 गावातील पाणंद रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला असून मंजूर गावापैकी काही गावांच्या पाणंद रस्त्यांची कामेही सुरु करण्यात आलेली आहेत.