हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या गरबा कार्यक्रमात 24 तासात 10 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आता इथून पुढे नागरिकांनी स्वतचे आरोग्य जपत आणि सावधगिरी बाळगत गरबा खेळावा असे आश्वासन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रविवारी गुजरातमधील कपडवंज खेडा येथे गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात गरबा खेळत असताना वीर शहा नावाचा 17 वर्षीय युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात देखील घेऊन जाण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी वीर शहाला मृत घोषित केले. असाच प्रकार, बडोद्यातील एका 13 वर्षाच्या मुलासोबत घडला. या मुलाचा मृत्यू देखील हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
इतकेच नव्हे तर, अहमदाबादमध्ये 28 वर्षीय तरुणाचा आणि वडोदरा येथील 55 वर्षीय शंकर राणा या दोघांचा मृत्यू देखील रविवारी गरबा खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच झाला. अशा तब्बल 10 जणांचा मृत्यू रविवारी झाला. या सर्वांच्या मृत्यूमागे हृदयविकाराचा झटका येणे हे एकमेव कारण असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घटनानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीनं अलर्ट जारी केले होते. तसेच, कार्यक्रमांच्या आयोजकांना सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यास सांगितल्या होत्या.
दरम्यान, नवरात्र उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमात तरुणांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण सहभागी होत असतात. गरबा खेळताना सर्वात जास्त शरीराची हालचाल होते. तसेच, उड्या मारल्यामुळे धांगडधिंगा केल्यामुळे याचा हृदयावर ताण पडतो आणि ब्लड प्रेशर वाढते. या कारणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील तितकीच वाटते. गुजरातमध्ये दांडिया कार्यक्रमात 24 तासात झालेल्या 10 जणांच्या मृत्यूमागे देखील हेच प्रमूख कारण मानले जात आहे.