राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील 10 हजार 122 प्रकरणे चर्चेसाठी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे. धोटे यांनी केले. जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, वकील संघाचे अध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲङ महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे. धोटे म्हणाल्या, राष्ट्रीय लोकअदालत ही पक्षकारांच्या कल्याणासाठी असून यामध्ये कोणत्याही पक्षकाराचे नुकसान केले जात नाही. लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकरांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे मिटवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित सुमारे 10 हजार 122 प्रकरणे चर्चेसाठी ठेवली आहेत. मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 14 पॅनेल आहे. तसेच ग्रामपचायतीचे थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वादपूर्व प्रकरणासाठी पंचायत समिती, सातारा येथे एक पॅनेल ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली. या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार उपस्थित होते

Leave a Comment