औरंगाबाद : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका शहरातील खासगी रुग्णालयांना एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या इंजेक्शनचे वाटप होणार असून, रविवारपासून इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
महापालिकेने बेंगळुरू येथील मायर्लेन कंपनीकडून प्रत्येकी ६५० रुपये या प्रमाणे दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी केली आहे. मेल्ट्रॉनच्या कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी पंधरा दिवसांत चार हजार इंजेक्शन वापरण्यात आले. घाटी रुग्णालयाला पहिल्या टप्प्यात दोन हजार इंजेक्शन देण्यात आले. शिल्लक असलेल्या इंजेक्शनपैकी एक हजार इंजेक्शन शहरातील खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थित रविवारी घेण्यात आला, त्यानुसार इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात आले. इंजेक्शनचे वाटप करण्यापूर्वी रुग्णालयांना इंजेक्शनची गरज आहे की नाही, याची पडताळणी घाटी रुग्णालयातील डॉक्टर व अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकारी करणार आहेत. खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून इंजेक्शनचे किती पैसे घ्यायचे, इंजेक्शनच्या बदल्यात पालिकेला जिल्हा प्रशासन किती पैसे देणार, या बद्दल मात्र निर्णय झालेला नाही. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या २ हजार ७९२ सक्रीय रुग्ण आहेत.
‘सिव्हिल’च्या कर्मचाऱ्यावर अजूनही कारवाईची प्रतीक्षा
रेमडेसिव्हिर औषधाच्या काळाबाजार प्रकरणात अटक केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते याच्यावर रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई केली जाईल. सध्या त्याच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे, असे जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.