हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीला शिक्षकांनी कपाळावर टीकली लावल्यामुळे कानाखाली वाजवली आणि याच कारणाने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य म्हणजे या मुलीचे वय अवघे १७ वर्षीय असून तिने सुसाईड नोटच्या माध्यमातून सर्व घडलेला प्रकार उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेटुलमारी येथील सेंट झेवियर्स शाळेत शिकणारी मुलगी सकाळी शाळेत गेल्यानंतर थोड्यात वेळात परत आली. यावेळी ती खूप उदास होती. शाळेत गेल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तिला टीकली लावल्यामुळे सर्वांसमोर कानाखाली मारली होती. यानंतर ती याची तक्रार नोंदवण्यासाठी मुख्यध्यापकांकडे गेली. मात्र त्यांनी देखील तिचे ऐकून घेतले नाही. यानंतर ती घरी आली. पुढे तिने सुसाईट नोट लिहीत आत्महत्या केली.
या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत मुलीच्या आईने सांगितले आहे की, तिने घरी आल्यावर हा सर्व प्रकार मला सांगितला. यानंतर मी तिला शाळेत घेऊन गेले. शिक्षकांनी मुलीची माफी मागावी हे मी मुख्यध्यापकांना सांगितले पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर मीच माझ्या मुलीची समजून काढली. घरी येऊन थोडा वेळ झाल्यानंतर ती कागदावर काही तरी लिहीत बसली होती. मी विचारल्यास तिने अभ्यास करत असल्याचे सांगितले. पुढे काही वेळातच तिने आत्महत्या केली. दरम्यान सुसाईट नोटमध्ये मुलीने शाळेला जबाबदार धरले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी मुख्यध्यापकांवर आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.