सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23 करता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर 11 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव चाखणार आहेत. प्रत्येक पथक तालुक्यातील 3 शाळांना भेटी देवून त्याचा आहवाल तयार करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील शाळांमधील शालेय पोषण आहाराची माहिती या पथकामुळे समोर येणार आहे. भरारी पथके पात्र शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही? भरारी पथकास शाळा तपासणी करताना आढळलेल्या बाबींचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला जाईल. ज्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सूट आहे. त्या शाळांमध्ये योजनेच्या सुधारणा करण्याबाबत अहवाल द्यावा. तसेच ही योजना राबवताना गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास ही बाब अहवालामध्ये नमूद करावी असेही या आदेशात म्हटले आहे.
शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर 11 पथकांची तपासणी करण्यात आली आहे. या पथकाना नेमून दिलेल्या तालुक्यातील तीन शाळांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केल्या आहेत. या पथकामुळे आता पोषण आहार मुलांना कसा मिळतो याची माहीती मिळणार आहे, तसेच चुकीच्या पध्दतीने काही होत असल्यास तेही समोर येणार आहे.