कृष्णा विश्व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

0
102
Krishna Vishwa University
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड कृष्णा विश्व विद्यापीठाचा 11 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील 961 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, की ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी सन 1982 साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर 1983 साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व 1984 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. 2005 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. स्व. जयवंतराव आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कृष्णा विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने नुकतेच कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण कृष्णा विश्व विद्यापीठ असे करण्यात आले असून, कृष्णा विश्व विद्यापीठ या नावाने होत असलेला हा पहिलाच दीक्षांत सोहळा आहे.

गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धती, एकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल ख्यातकीर्द असणाऱ्या कृष्णा विश्व विद्यापीठाच्या यंदाच्या 11 व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (411), नर्सिंग (151), दंतविज्ञान (118), फिजिओथेरपी (167), अलाईड सायन्स (48) आणि फार्मसी (66) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण 961 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान केली जाणार आहे. यापैकी 13 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी दिली आहे.