अदानी- मोदींचे फोटो दाखवत राहुल गांधींचा हल्लाबोल; लोकसभेत सवाल करत म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात दोन व्यक्तींची चांगलीच चर्चा सुरु आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व दुसरे गौतम अदानी होय. गौतम अदानी व मोदींच्या मैत्रीत अदानींना मोठी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, आज लोकसभेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावेळी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे काही फोटो सभागृहात झळकावत त्यांनी अदानी मोदींच्या विमानातून प्रवास करतात. त्यांना केंद्र सरकारकडून बजेटमध्ये कशी काय मदत देण्यात आली? असते अनेक सवालही उपस्थित केले.

भारत जोडो यात्रेमुळे चांगलेच चर्चेत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेच्या सभागृहात आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी भाषणात ते म्हणाले की, आज सगळीकडे अदानींचे नाव आहे. रस्ता कोणी बांधला तर अदानींचे नाव समोर येईल. हिमाचलमधील सफरचंदावरदेखील अदानींचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे असतील तर जुने फोटो पहा असे म्हणत त्यांनी सभागृहात फोटोही झळकावले.

आधी पंतप्रधान मोदी अदानीच्या विमानात जायचे. आता अदानी पीएम मोदींच्या विमानात जातात. ‘पीएम मोदींच्या विदेश दौऱ्यात तुम्ही आणि अदानी किती वेळा एकत्र गेलात?, ‘तुम्ही अदानीला किती वेळा भेटलात?, तुमच्यासोबत अदानी किती परदेश दौऱ्यावर आले? तुमच्या भेटीनंतर अदानींना किती देशांमध्ये कंत्राट मिळाले? आदी प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.

भारत जोडो यात्रेदरम्यान मुलं, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली. तरुणांनी बेरोजगार अथवा कॅब चालवत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पीएम विमा योजनेतून निधी मिळाला नसल्याचे सांगितले. अग्निवीर योजनेत भरती झालेल्या युवकांनी चार वर्षानंतर नोकरी जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे गांधी यांनी म्हंटले.