सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज रथोत्सव 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला असून भाविकांच्या सोयीसाठी 21 डिसेंबर पासून ते 27 डिसेंबरपर्यंत सुमारे 138 बसेस तैनात करण्यात आल्या आहेत.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज रथोत्सवाचा मुख्य दिवस हा 22 डिसेंबर असल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी बसची खास सोया करण्यात आलेली आहे. सातारा विभागामार्फत पुसेगाव रथोत्सववासाठी भाविकांना येता यावे म्हणून 20 गाड्या, कराड आगारातून 10, कोरेगाव आगारातून 20, फलटण आगारातून 20, वाई आगारातून 7, पाटण आगारातून 10 ,दहिवडी आगारातून 16, महाबळेश्वर आगारातून 5, मेढा आगारातून 5, पारगाव-खंडाळा आगारातून 5 आणि वडूज आगारातून 20 अशा एकूण 138 बसेसची सोया करण्यात आली असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त 17 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 रोजी मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होईल. दि. 14 ते 17 डिसेंबरदरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धा, दि. 17 व 18 श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर दिवसरात्र खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धा, 19 डिसेंबरला सकाळी श्वानांच्या शर्यती, 20 डिसेंबर रोजी बैलगाडा शर्यती, दि. 21 डिसेंबरला निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.