हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्तीसगड (Chattisgarh) आणि ओडिशा (Odisa) सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडच्या कुलरीघाट राखीव जंगलात झालेल्या भीषण चकमकीत 14 हून अधिक माओवादी (Maoism) ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिला माओवादींचा समावेश आहे. या कारवाईत सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक जवान किरकोळ जखमी झाला आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर 19 जानेवारीच्या रात्री या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. छत्तीसगड आणि ओडिशातील सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली गेली. यामध्ये जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), कोब्रा बटालियन आणि ओडिशाच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी)च्या जवानांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत एका कुख्यात माओवादी कमांडरचा समावेश असलेल्या 14 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या मोहिमेच्या वेळी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि अन्य साहित्य हस्तगत केले आहे. महत्वाचे म्हणजे, या कारवाईत एक कोटी रुपयांचे इनाम असलेला माओवादीही मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या चकमकीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर ही मोठी चकमक झाली. या चकमकीत कोब्रा बटालियनच्या एका जवानाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, आता ही कारवाई माओवाद्यांच्या विरोधातील एक मोठे यश मानले जात आहे.




