मुंबईचे तापमान अधिकच वाढू लागले आहे. आणि त्याचबरोबर शहरातील लोकल प्रवासही अधिक दमवणारा ठरतो आहे. अशा वेळी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय, मध्य रेल्वेवर लवकरच एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे 16 एप्रिलपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने उकाड्याचा विचार करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. सध्या 6 एसी लोकल धावतात, ज्यामधील 5 गाड्या रोज 66 फेऱ्या पूर्ण करतात. आता ‘अंडरस्लंग’ एसी लोकलचा समावेश करून हा आकडा 7 वर जाणार आहे, आणि त्यातून 14 नव्या सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. या सेवांचा प्रारंभ बदलापूर, कल्याण आणि विद्याविहार स्थानकांवरून होणार आहे.
प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
मात्र या निर्णयामुळे लोकल प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कारण या एसी फेऱ्या थेट साध्या लोकलच्या वेळापत्रकात बसवण्यात येणार असल्यामुळे, सामान्य प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ‘एसी विरुद्ध नॉन-एसी’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
दररोज मध्य रेल्वेवर 39 लाख नागरिक प्रवास करतात, त्यात 1810 सामान्य लोकल सेवा असून केवळ 66 एसी लोकल फेऱ्या आहेत. त्यातही फक्त 84,000 लोक एसी गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे सामान्य फेऱ्या कमी करून एसी सेवा वाढवणे हे काही प्रवाशांना अडचणीचे वाटू लागले आहे.
पश्चिम रेल्वेलाही एसीचा मोह…
फक्त मध्य रेल्वेच नाही, तर पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलप्रति वाढती लोकप्रियता लक्षात घेता, तिथेही फेऱ्यांच्या विस्ताराचा विचार सुरू आहे. वातानुकूलित गाड्यांमुळे रेल्वेच्या महसुलात वाढ झाली असून, प्रवाशांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, असं पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जरी एसी लोकलच्या वाढीमुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो, तरी हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. गरज आहे ती योग्य व्यवस्थापनाची आणि संतुलन राखण्याची.