हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलांना आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 14,159 महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मासिक अनुदानावर परिणाम येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 90 टक्के लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी उर्वरित महिलांसाठी मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी या कालावधीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी अनिवार्य का?
सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र निराधार महिलांना दरमहा 600 रुपयांची मदत दिली जाते. परंतु काही महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे लाभ घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे आवाहन
संजय गांधी निराधार योजनेसाठी जिल्ह्यात एकूण 1,45,515 लाभार्थी आहेत. त्यापैकी 14,159 महिलांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे जमा केलेली नाहीत. या महिलांनी आपली मदत कायम ठेवायची असल्यास तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.
महिला लाभार्थींनी वेळेत केवायसी पूर्ण न केल्यास अनुदान बंद होण्याचा फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप आपली माहिती अपडेट केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.