कराड | नांदलापूर (ता. कराड) येथील दगडखाणी सील करूनही रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन करणाऱ्या 15 खाणी पुन्हा सील करून त्याकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 12 क्रशरही सील करण्यात आले आहे. संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी दिली.
कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दगडखाणींसाठी उत्खनन केले जाते. अनेकदा अवैधरीत्या उत्खनन होत असल्याचे महसूल विभागाने यापूर्वी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. नांदलापूर येथील खाणींतून अवैधरीत्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार देवकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “नांदलापूर येथे सरकारी जागेतील गट नंबर ४१० मध्ये सात खाणी आहेत, तर खासगी जागेतील गट नंबर 409 मध्ये 8 खाणी आहेत. मुदत संपल्याने या खाणी महिन्यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत, तरीही या खाणपट्ट्यात रात्रीच्या वेळी चोरून उत्खनन होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे संबंधित खाणी आणि दोन्ही ठिकाणचे 12 क्रशर सील करण्यात आले आहेत.
प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या सूचनेनुसार प्रभारी तहसीलदार देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचे मंडलाधिकारी पी. डी. पाटील, तलाठी सुजित थोरात, हणमंत चौधरी, दीपक काणकेकर, म्हारू राऊत, आर. बी. पाटील यांनी ही कारवाई केली.