सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
विजया दशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी सातारा जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यातून 640 वाहनातून 15 हजार लोक बीकेसीवरील शिंदे गटाच्या मेळाव्याला जातील असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातून मेळाव्यासाठी करण्यात आलेली तयारीची माहिती माध्यमांना दिली. आ. शंभूराज देसाई म्हणाले, गेल्या 15 दिवसापासून आम्ही तयारी केली असून जिल्ह्यातून 180 ट्रॅव्हल्स बससह सुमो, स्कॉर्पिओ या 460 गाड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून एकूण 640 वाहने जाणार असून गरज पडल्यास 200 एसटी यासाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यातून एकूण 15 हजार लोक जाणार आहेत.
मेळाव्याला 2 लाख लोक जमतील
मेळाव्याला येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 नंतर वाहने मुंबईच्या दिशेने रवाना केली जाणार आहेत. या मेळाव्याला अंदाजे 2 लाख लोक जमतील. मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याने मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी मुंबई पोलीस मेळाव्यासाठी कार्यक्षम असल्याचे सांगितले आहे. मुंबईतून परत येतानाही ग्रामीण भागातील लोकांची जेवणाची सोय मुंबई व ठाणे येथील शिवसैनिकांनी केली आहे.