मेढा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हाते खुर्द या कंटेन्मेंट झोनमधील गावातील त्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या गावात मुंबईहून राहायला आलेल्या एका कुटुंबात एक मृतदेह तीन दिवस आपल्या घरीच ठेवल्याची घटना घडली होती. मुंबईवरून पहिल्यांदाच आपल्या गावी राहायला आलेल्या दळवी कुटुंबातील १६ वर्षाचा मुलगा अर्णव दळवी याचा मृत्यू झाला होता. पण कोरोना संसर्गामुळे आजूबाजूला झालेल्या संशयी वातावरणामुळे दळवी कुटुंबाने आपल्या घरी मृत्यू झाल्याचे लपवून ठेवले. व मृतदेह घरीच ठेवला होता. या कटुंबातील सदस्यांनी मुलाला कोरोना असल्यामुळे मृतदेह लपवला नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये होती
अर्णव च्या मृतदेहाचे जैविक विघटन होण्यास सुरुवात झाल्यावर पसरलेल्या दुर्गंधीने परिसरातील लोकांना मृत्यू झाल्याचे समजले. मृतदेह विघटित झाल्याने शवविच्छेदनात मृत्यू कशाने झाला हे समजले नव्हते. त्यामुळे त्याला कोरोना झाला होता की नाही याची खात्री नव्हती. म्हणूनच या कुटुंबातील इतर सदस्यांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच या कुटुंबाला रायगाव येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गावातील लोकांना प्रचंड चिंता वाटत होती. मात्र आज या कुटूंबाचे अहवाल नकारात्मक आल्याने गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
मुंबईहून आलेल्या या कुटुंबाच्या संशयात्मक कृती जसे की आजूबाजूच्यांशी फार बोलायचे नाही, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांना पुरेशी माहिती द्यायची नाही यामुळे नागरिकांनी ही माहिती सरपंच विमल दळवी यांना माहिती दिली होती. अर्णव गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. असे प्राथमिक तपासणीत दिसून आले होते. पण गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने नागरिकांमध्ये हा प्रकार काहीतरी वेगळा असल्याची भीती निर्माण झाली होती. पण आजच्या अहवालामुळे आता सर्वांची चिंता नाहीशी झाली आहे.