गडचिरोली | विजय-किरण फाऊंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील 15 हजार विद्यार्थीनींना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करणार असल्याची घोषणा प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी केली. 14 डिसेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते या सायकलींचे वाटप होणार आहे. जंगलातून पायी शाळेत जाणार्या मुलींकरता गडचिरोलीत 15 हजार सायकली वाटण्याचा आम्ही विचार केला अशी प्रतिक्रिया शिवाणी वडेट्टीवार यांनी हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना दिली आहे.
याबाबत बोलताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, गडचिरोली जिल्हा हा मंत्री विजय वडेट्टीवार यांची कर्मभूमी होती. गडचिरोली जिल्हा हा नक्षली आणि जंगली विभाग असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किमान 3 ते 10 किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे हा सायकल वाटपाचा कार्यक्रम राबवण्याचा विचार आम्ही केला ज्यामुळे मुलींना याचा फायदा होईल आणि शिक्षणा मध्ये जे अडथळे येत आहेत ते कुठेतरी कमी होतील हाच यामागील विचार आहे असे शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले.
अतिदुर्गम आणि डोंगर दऱ्याने व्यापलेल्या या जिल्ह्यात दळवळणाची साधने तशी कमीच आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींना मोठी अडचण निर्माण होत असे. हीच गोष्ट लक्षात घेत १५००० विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नये यासाठी मी थोडासा प्रयत्न केला आहे, येणाऱ्या काळात देखील मुलींचे शिक्षण,आरोग्य यासह विविध विधायक कार्य करत राहणार आहे असेही शिवानी वडेट्टीवार यांनी म्हंटल.