औरंगाबाद – शहरातील बहुप्रतिक्षित शिवाजीनगर येथील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी रेल्वेने 16 कोटी 52 लाख रुपये मंजूर केले आहेत. असे शपथपत्र रेल्वे खात्याच्या वतीने ॲड. मनीषा नावंदर यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केले. त्यामुळे त्यापासून प्रतीक्षेत असलेला हा मार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असलेल्या शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहे. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यावर जनहित याचिका दाखल करण्यात आली, त्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, एम.जी. मेहरे यांच्या खंडपीठात मंगळवारी सुनावणी झाली रेल्वेच्या औरंगाबाद विभागाचे सहाय्यक विभागीय अभियंता जनार्दन बालमूच यांचे छोटेखानी शपथपत्र ॲड नावंदर यांनी सादर केले. त्यात त्यांनी सांगितल्यानुसार मागील वेळी शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे बोर्डाची मंजुरी घेण्यात आली आहे. खंडपीठाने 17 जुलै च्या आदेशात या कामासाठी रेल्वे बोर्डाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार बोर्डाच्या संचालकांनी 26 ऑगस्ट रोजी 16 कोटी 52 लाखांची तरतूद केली आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी रेल्वे बोर्डाने 28 ऑगस्ट 2021 अखेर मंजुरी तसेच निधी उपलब्ध करून द्यावा असे खंडपीठाने म्हटले होते. त्याचप्रमाणे सरकारी वकिलांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा असे आदेशही खंडपीठाने दिले होते.