Sunday, June 4, 2023

युक्रेनमध्ये अडकलेले ‘या’ जिल्ह्यातील 16 विद्यार्थी परतले, आणखी चार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्हयातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी सुखरुप घरी परतले. अद्याप चार विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत, त्यांना हंगेरी, रोमालियामार्गे भारतात आणले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांचे युद्धामुळे आलेल्या कटू आठवणी सांगताना अश्रूंचा बांध फुटल्याचे चित्र होते.

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. रशियाकडून युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी तिथे अडकले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील वीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्याची सर्व माहिती जिल्हा नियंत्रण विभागामार्फत सरकारकडे पाठविण्यात आली होती. युक्रेनमध्ये अडकलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थी परतले आहेत.

तुंग येथील अभिषेक प्रकाश पाटील, कसबेडिग्रज येथील प्रथमेश सुनिल हंकारे, सांगलीतील तोहिद बशी मुल्ला, दिघंचीतील विठ्ठल सुभाष मोरे, दिघंचीतील स्नेहल नवनाथ सावंत, दिघंचीतील संध्याराणी रामचंद्र मोरे, आटपाडीतील कोमल तानाजी लवटे, जत मधील यश मनोज पाटील, साक्षी महावीर शेटे, श्रद्धा महावीर शेटे दोघी वाटेगाव, राहुल संजीव माने गुंडेवाडी, सौरभ विजय इसापुरे मिरज, योगिनी विघ्नेश देशपांडे मिरज, वैष्णवी गणपतराव शिंदे तिप्पेहळ्ळी, यशराज पराग पवार जत हे सोळा विद्यार्थी घरी परतले आहेत. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांनी तेथील युद्धामुळे आलेल्या कटून आठवणींना वाट करुन दिली.