औरंगाबाद – सिडको भागातील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करताना काल सायंकाळी तब्बल 1689 ब्रिटीशकालीन नाणी सापडली. ही नाणी तब्बल दोन किलो वजनाची आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहेत.
एमजीएमसमोरील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार वर्षभरापासून याठिकाणी काम सुरू आहे. काही दिवसांपासून स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी रोहित स्वामी यांच्या एजन्सीमार्फत खोदकाम केले जात आहे. सोमवारी सायंकाळी सहादरम्यान जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम सुरू असताना अचानक नाणी सापडली. नाण्यांचा आवाज आल्याने जेसीबीचे काम थांबवून खड्ड्यात पाहणी केली असता एका गाठोड्यामध्ये ही नाणी होती. नाणी सापडताच रोहित स्वामी यांनी महापालिकेचे वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना माहिती दिली. गोरे यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता ही नाणी ब्रिटीशकालीन असल्याचे निदर्शनास आले. या नाण्यांचे वजन एक किलो 958 ग्रॅम एवढे वजन भरले
राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील नाणी
नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून, 1854, 1861, 1881 या काळातील ही नाणी आहेत. नाणी सापडल्यानंतर गोरे यांनी सिडको पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर राज्य पुरातत्व विभागाला कळविण्यात आले. पुरातत्व विभागाकडे ही नाणी सुपूर्त केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.