सातारा- जावलीतील सात कामांसाठी अर्थसंकल्पात 17 कोटी 62 लाखांचा निधी : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा -जावली मतदारसंघातील विविध विकासकामे चालू अर्थसंकल्पात मतदार संघातील सात रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 17 कोटी 62 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अर्थसंकल्पात सातारा तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी 7 कोटी 85 लाख तर जावली तालुक्यातील तीन रस्ते व चार लहान पूल बांधण्यासाठी 9 कोटी 73 लाख रुपये निधी मिळाला असल्याची माहिती सातारा विधानसभेचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सातारा तालुक्यातील सोनगाव, खिंडवाडी, कोडोली, संगम माहुली, प्रतापसिंहनगर, खेड, सदरबझार (राज्य मार्ग 140) येथे सोनगाव ते खिंडवाडी या भागाची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 20 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग 29 ते पोगरवाडी, आरे, दरे, रेवंडे, वावदरे, राजापुरी या मार्गावरील पोगरवाडी फाटा ते रेवंडे या भागाची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी 75 लाख तर भोंदवडे, अंबवडे बु., सायळी, वडगाव, सावली, कुरुलबाजी, कुडेघर, रोहोट, पाटेघर, आलवडी, धावली (प्रमुख जिल्हा मार्ग 135) येथे सावली ते आलवडी या भागाची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. जावली तालुक्यातील आंबेघर, केडंबे, बोंडारवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 4 कोटी 27 लाख, कास ते महाबळेश्वर या शिवकालीन राजमार्गावरील चार लहान पूल बांधण्यासाठी 2 कोटी 66 लाख, दिवेदेव, मार्ली, आखाडे या रस्त्यावरील मार्ली ते भालेघर या भागाची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 42 लाख तर पाचवड ते मेढा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 1 कोटी 42 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तातडीने निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 27 कोटी 47 लाख पोवई नाका येथे असलेल्या प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांसाठी नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचे काम आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतले आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी अर्थसंकल्पात 27 कोटी 47 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे हि नवीन इमारत उभी राहण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.