हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच रात्रीत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रचंड गोंधळ, अनागोंदी, रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेने असलेली अपुरी डॉक्टर क्षमता या सर्व कारणांमुळे एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. या 17 रुग्णांमधील 13 रुग्ण हे ICU मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. रुग्णालय प्रशासनाने सुद्धा या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या बातमीला दुजोरा दिला आहे. काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी याठिकाणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटल बंद झाल्यापासून जिल्ह्यातील रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.
यापूर्वी सुद्धा 10 तारखेला एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 5 जणांचा धक्कादायक मृत्यू झाला होता. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, एकाच उलटी झाल्याने, आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता त्यामुळे मृत्यू झाल्याचे समजलं होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षातील नेत्यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच हॉस्पिटल प्रशासनावर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं होते. त्यातच आता पुन्हा एकदा तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठाण्याचे आहेत त्याच ठाण्यात जर अशी आरोग्य व्यवस्था असेल तर करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय.