महाराष्ट्रात चाललंय काय!! आता नालासोपाऱ्यात 17 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात बलात्कार (Maharashtra Crime) , अत्याचार आणि हत्या यांचे प्रमाण वाढलं आहे. बदलापूर, नागपूर, कोल्हापूर, अकोला अशा जवळपास १० ठिकाणी १० अत्याचाराच्या घटना समोर आल्यात. या एकूण सर्व प्रकरणांनी महाराष्ट्र हादरला असून राज्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. त्यातच आता अशा गुन्ह्याची आणखी एक भर पडली आहे. नालासोपाऱ्यात 17 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार (Nalasopara Girl Raped) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसानी गुन्हा दाखल करत सदर आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत .

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 वर्षीय पिडीत मुलगी मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहते मात्र नालासोपार्‍यात ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अधून मधून यायची. याच दरम्यान, तिच्या मैत्रिणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची आणि सदर पीडित तरुणीची मागील आठवड्यातच ओळख झाली. गुरुवारी या तरुणाने पीडित तरुणीला भेटण्यासाठी बोलावले, त्यावेळी त्याचा मित्र सुद्धा सोबत होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सदर मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा सर्व प्रकार सांगितला.

सदर प्रकारची गंभीरता लक्षात घेऊन पालकांनी तातडीने तुळींज पोलीस स्टेशन गाठलं. तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र मागील दिवसांत महाराष्ट्रात मुलींवर अत्याचाराच्या घटना ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता अतिशय गंभीर स्थिती राज्यात आहे. मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा आहे. यावर उपाय करण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलावी असं मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.