हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या धावपळीच्या जीवनात हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचे प्रमाण वाढलं आहे. युवकांपासून ते वृद्धापर्यंत कोणीही हृदयविकाराचा बळी पडू शकते. त्यामुळे कोणाला कधी अटॅक येईल हे सांगता येत नाही. त्यातच आता क्रिकेट खेळता खेळता हर्ट अटॅकने एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सदर मृत तरुण हा उत्तरप्रदेशचा आहे. महत्वाचं म्हणजे 2 दिवसांपूर्वी सुद्धा एका 24 वर्षाच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 वर्षीय प्रिन्स सैनी हा दहावीचा विद्यार्थी असून उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. शनिवारी तो हसनपूर येथील कायस्तान परिसरात आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यावेळी क्षेत्ररक्षण करत असतानाच तो थंड पाणी पिला आणि जागीच चक्कर येऊन बेशुद्ध पडला. यानंतर घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याच्या पालकांना ही गोष्ट सांगितली. प्रिन्सला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले, परंतु तत्पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे.
प्रिन्सच्या अशा अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रिन्सला दोन भाऊ बहीण आहेत. शक्यतो लहान मुलांना असा हृदयविकाराचा त्रास होत नाही, परंतु प्रिन्सला लहानपणापासूनच याबाबत काहीतरी समस्या असू शकते असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. लहान मुलांना हृदयविकाराची लक्षणे लवकर दिसत नाहीत, त्यासाठी वेळोवेळी चाचणी केली पाहिजे असेही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं.