सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 19 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यातील चार लोक लक्षणं रहित तर उर्वरित 15 लोक लक्षण विरहीत (असिम्टोमॅटिक) असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय पथकाने या ठिकाणी ठिय्या दिला असून संबंधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी एका वृद्धाला बुधवारी रात्री उशिरा सातारा येथील जम्बो कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-कोरेगांव रोडवरील खावलीच्या मातोश्री वृध्दाश्रमातील चार जणांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यामुळे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चौघेही बाधित असल्याचं निष्पन्न झाल. त्यामुळे प्रशासनानं वृद्धाश्रमात सर्वच नागरिकांची तपासणी केली असता उर्वरित 15 लोकही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला. बाधित ज्येष्ठ नागरिकांना कोरोना केअर सेंटरमध्ये हलवण्यात आला आहे. तर पंधरा लक्षणविरहित बाधितांवर वृद्धाश्रमातच विलगीकरणात ठेवून उपचार केले जाणार असल्याचं प्रशासनातील खात्रीशीर सूत्रांनी स्पष्ट केलं.
दरम्यान जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे प्रशासनापुढे चिंतेचा विषय बनला आहे. महागाव ग्रामपंचायतीला आश्रमाचे सॅनिटायझर करायला सांगितले असल्याची माहिती, चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा