चंदेरी दुनिया । बायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही. तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात.
अशाच लता करे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून ‘लता भगवान करे – एक संघर्ष गाथा’ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरवर एक उतारवयातील स्त्री शेतामध्ये शून्यात नजर लावून बसलेली आहे. त्या शेताला प्रकाशझोत असलेल्या अत्याधुनिक धावण्याच्या मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे त्या लता करे खुद्द मुख्य भूमिकेत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच भगवान करे, सुनील करे यांनीही अभिनय केला आहे. याशिवाय रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.
आराबोथु कृष्णा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. मेकअप शीतल कांडरे व छायांकन आदित्य सणगरे, कमलेश सणगरे यांनी केले आहे तर संकलक बोद्दू शिवकुमार, स्थिर छायांकन प्रतिक कचरे यांनी केले आहे.
चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अतुल साबळे तर निर्मिती व्यवस्थापक प्रवीण बर्गे आहेत. ध्वनी मुद्रण वेंपती श्रीनिवास यांनी व डीआय गोविंद कट्टा यांनी केले आहे. सत्य घटनेवरील प्रेरणादायी कथा असलेला ‘लता भगवान करे’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.