ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ठाकरे गटाने एकूण 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, जळगाव मतदारसंघातून ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांच्या ऐवजी करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसऱ्या यादीतील ठाकरे गटाचे उमेदवार

जळगाव – करण पवार (उन्मेष पाटील समर्थक)
कल्याण डोंबिवली – वैशाली दरेकर
हातकणगले – सत्यजित पाटील
पालघर – भारती कामिड

या अगोदर ठाकरे गटाने आपल्या पहिल्या यादीतून 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. ज्यात अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यांच्या नावाचा समावेश होता. त्यामुळे ठाकरे गटातून जाहीर करण्यात येणाऱ्या दुसऱ्या यादीत नेमक्या कोणत्या नेत्यांना संधी देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशातच, जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु ठाकरे गटाने उन्मेष पाटील यांच्याऐवजी जळगाव मतदारसंघातून करण पवार यांना तिकीट दिले आहे.

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर याच्यांविषयी भाषण केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. यावेळेस जमलं नाही. पण ते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील असं वाटलं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला, संविधान वाचविण्यासाठी एकत्र यावं. मी कार्याकर्त्यांना सांगितलं त्यांनी कितीही आरोप केला तरीही बोलू नका अशा सूचना केल्या आहेत”