हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात येतील. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेअंती राज्य सरकारने एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधी साठीच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली आहे. म्हणजेच, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 1,720 कोटी रुपये निधी मंजुर केला आहे. दरम्यान, या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या बजेटमध्ये केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. महत्त्वाचे म्हणजे, नमो आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मिळून शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12 हजार रुपये देण्यात येतात. त्यामुळे ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.