सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सिद्धेवाडी येथील विजयसिंहराव नानगुरेयांना दिलीप बिल्डकॉमच्या कामगार कन्हैया सिंग आणि रुपेंद्र तोमर यांसह सात ते आठजणांनी सिगारेट देत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोड करून चारचाकी गाडीही पेटवली व दुचाकीचे ही नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या राड्यात अंदाजे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून दुकानदार विजयसिंहराव नानगुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात कन्हैया कुमार व इतर सातजणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मिरज ग्रामीण पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कन्हैया सिंग आणि रुपेंद्र तोमर यांना अटक केली आहे.
शुक्रवारी रात्री दिलीप बिल्डकॉम कंपनीमध्ये काम करणारा कामगार कन्हैया व त्याचा एक साथीदार असे बोलोरो गाडी घेऊन आले. त्यावेळी कन्हैयालाल सिंग याने दारूच्या नशेत नानगुरे यांना सिगारेट मागितले. यावेळी नानगुरे यांनी संचारबंदी असल्यामुळे दुकानात माल कमी आहे. सिगारेट विकत नसल्याचे अनेकदा सांगितले. मात्र नशेत असलेल्या कन्हैयालाल सिंह हा नानगुरे यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. त्याला विरोध करताच सिंग आणि त्याच्यासोबतच्या अन्य व्यक्तीने नानगुरे यांना मारहाण केली. अंड्याचे ट्रे, तसेच किराणा मालाचे साहित्य, कोल्डिंक्सच्या बाटल्या, फोडून नासधूस केली. तसेच जवळच असलेल्या रूममधील बेडवरील गादीला व स्वीप्ट गाडी आग लावली. तसेच नानगुरे यांना मारहाण केली.
या प्रकाराची नानगुरे यांनी सिद्धेवाडीत माहिती दिली. त्यानंतर सिद्धेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दुकानाचे मालक नानगुरे यांनी बाका प्रसंग पाहून तेथून काढता पाय घेतल्याने ते बचावले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.