सातारा | पानमळेवाडी (ता. सातारा) येथे एका राहत्या घरात घोणस जातीचा विषारी साप व त्याची 20 पिल्लं सापडली आहेत. राहत्या घरात सापासह पिल्लं सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पानमळेवाडी गावातील संदीप माळी यांच्या राहत्या घरात साडेतीन फूट लांबीचा विषारी घोणस साप व त्याची तब्बल 20 पिल्लं आढळून आली. संदीप माळी यांच्या पत्नी स्वयंपाक करत असताना त्यांना एक सापाच पिल्लू दिसलं. संदीप माळी यांनी लागलीच सर्पमित्र पवन राठोड यांना फोन करून बोलवून घेतलं. पवन राठोड, सुमित वाघ व त्याचे सहकारी तेथे पोहोचले व त्यांनी घरात शोध घेत त्या पिलांना पकडले.
यावेळी या घरात अजून सापाची पिल्लं व साप असल्याची शक्यता सर्पमित्रांना जाणवली. त्यांनी घरात सर्व ठिकाणी शोधशोध सुरु केली. त्यावेळी एकेक पिल्लू त्यांना सापडले. यासाठी त्यांना घरातील एक भिंत व फरश्या काढाव्या लागल्या. यातच त्यांना साडेतीन फूट लांबीचा विषारी घोणस सर्प सापडला. पवन राठोड , सुमित वाघ, शैलेश देशमुख व अतिष कोळी या टीमने ही कामगिरी केली.