यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी – केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत तोडसाम यांच्या जागी आता भाजपाचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची विधानसभेसाठी वर्णी लागली आहे.
आमदार तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपाने नाकारल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठेकेदाराला फोनवरुन खंडणी मागण्याचा तोडसाम यांचा कथित ऑडिओ प्रचंड वायरल झाला होता. तसेच पांढरकवडा येथे ऐन पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी एका कार्यक्रमात तोडसाम यांच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीस भर चौकात केलेली मारहाण केल्याचा वायरल झालेला विडिओ या दोन्ही प्रकरणामुळे त्यांची बदनामी झाली होती.
या सर्व प्रकारांची दखल घेत भाजपाने जर त्यांची उमेदवारी कायम ठेवली असती तर ही जागा भाजपाच्या हातातुन निसटण्याची शक्यता होती अशी चर्चा या मतदारसंघात सुरु होती. दरम्यान सध्या त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे तोडसाम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.