हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आमदार फुटणार आणि भाजपमध्ये जाणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सामनातून हा दावा करण्यात आला होता. आता हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. राज्यात एका नियमबाह्य बनलेल्या पक्षात दोन गट पडले आहे. त्यापैकी एका गटातील २२ आमदार एका पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता दोन गट पडले आहे. त्यापैकी २२ जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहे.मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशाराही दिला होता. हा इशारा कुणाला होता, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
फडणवीसांचे प्रत्युत्तर –
आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पलटवार केला. उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे 20 आमदार आहेत, तेही भाजपच्या गळ्याला लागलेत, असं कोणाच्या म्हणण्याने होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचंय? शिवसेना शिंदेसेना आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे, त्यामुळे मित्र पक्षाचे आमदार आम्हाला घेऊन अशा प्रकारचं राजकारण करत नाही. याउलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होताना पहायला मिळेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.




