कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या काळात माणुसकी,सामाजिक बांधिलकी जपत असणारे अनेक जण पहायला मिळाले. तसेच आरोग्य क्षेत्रातही वैद्यकीय उपचार देण्याचेही अनेकजण काम करत आहेत. मात्र असचं माणुसकीचं मन हेलावणारं काम कराडच्या कृष्णा रुग्णालयात बघायला मिळत आहे. या हाॅस्पीटलमध्ये कोरोना पाॅझीटीव्ह असणाऱ्या 225 महिलांनी बाळांना जन्म दिला, अशावेळी त्या स्वतः पाॅझीटीव्ह असल्याने त्यांना बाळांना संभाळता येत नव्हते. तेव्हा त्यांच्या पिल्लांना हाॅस्पिटलमधल्या नर्सेसनी संभाळण्याचे काैतुकास्पद काम केले आहे.
कोरोना काळात अनेक अडचणींना समोरे जावं लागलं आहे. या रोगातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची लागण झाली की कोणत्याही नातेवाईकाला रुग्णांबरोबर राहता येत नाही. या रोगाने अनेक गर्भवती महिलांनाही सोडलं नाही. त्यामुळे लागण झाली असताना बाळाला जन्म दिला की हे बाळ त्यांच्याबरोबर ठेवता येत नाही. त्या आईच्या हातात बाळाला दिलं जाऊ शकत नाही. त्यातच कोणताही नातेवाईक ही त्या बाळाच्या जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. कराडच्या कृष्णा रुग्णालयातही 225 महिलांना कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या बाळांना सांभाळायचे कुणी हा प्रश्न होता, मात्र हाॅस्पिटलमधल्या नर्सनी याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ- दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले आणि मायेने जपलं.
बाळांची जबाबदारी अभिमानास्पद
कृष्णा हाॅस्पिटलला व्यवस्थापनावर कोविडचा ताण आहे. तरीही बाळांना जन्म देणाऱ्या महिला पूर्ण कोरोनामुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पिल्लांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. यासाठी लागणारे मनुष्यबळही हाॅस्पीटलने पुरवले आहे. आम्हांला हे काम अभिमानस्पद वाटत असल्याचे नर्स सुप्रिया यादव यांनी सांगितले.
महिला कर्मचाऱ्यांचा अभिमान : डाॅ. संजय पाटील
कोरोनात माणुसकीच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रुप आहे. या दिवसांत या पिल्लांना दिलेली मातृत्त्वाची ऊब अमुल्य आहे. आमच्या स्टाफमधील महिला कर्मचारी अत्यंत चोख काम करत असून आम्हांलाही त्यांचा अभिमान असल्याचे डाॅ. संजय पाटील यांनी सांगितले.