रेशनिंग दुकानासमोर नागरिकांची तोबा गर्दी; वडगांवमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

अहमदनगर | राज्यात कोरोना विषाणूने थेमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील लाॅकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा करत ग्रामिण भागात कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंचांनी विशेष लक्ष घालण्याचे आवाहन केले. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील वडगांवमध्ये रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची तोबा गर्दी पहायला मिळते आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. गावातील तरुणांनी याकरता सदर दुकानदारास नियमांचे पालन करण्याची विनंती करुनसुद्धा यात बदल झालेला नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वडगांवमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही रेशन दुकानात सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.

गावातील तरूणांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवाउडवी उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. ग्रामपंचायतीच्या अश्या ढिसाळ कारभारामुळे पुढील काळात गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर त्याला ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल असा आरोप गावातील तरूणांनी केला आहे.

रेशन धान्य दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्य वाटप करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक पातळीवर कसलेच नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.