हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात असून अटकेतील त्या 23 जणांना काल सायंकाळी सातारा येथे आणण्यात आले. तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 16 जणांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज शनिवारी वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदर आरोपींची सध्या सातारा येथील सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्टच्या वादातून पुसेसावळी येथील जमावाने अल्पसंख्याक बांधवांची घरे, दुकाने, वाहने लक्ष्य करत तोडफोड, जाळपोळ केली होती. याचदरम्यान जमावाने प्रार्थनास्थळावर हल्ला करत त्याठिकाणी असणाऱ्या 10 जणांना मारहाण केली होती.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नूरहसन शिकलगार (वय 27) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात खून, शासकीय कामात अडथळा आणण्यासह एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दंगल, मृत्यूप्रकरणात 23 जणांना अटक केली आहे.
‘या’ 16 जणांना आज न्यायालयात करणार हजर
यामध्ये ज्योतीराम आनंदराव भाडुगळे, किशोर शहाजी कदम, जयराम अशोक नागमल, किरण गोरख घार्गे, विजय बजरंग निंबाळकर, सोमनाथ बाबूराव पवार, महेश रामचंद्र कदम, विकास वसंत घार्गे, शिवाजी विनायक पवार, श्रीनाथ हणमंत कदम, दादासाहेब मारुती माळी, सागर संपत जाधव (सर्व रा. वडगाव जयराम स्वामी), अनिरुद्ध सतीश देशमाने (रा. पुसेसावळी), नीलेश अनिल सावंत, सागर सिद्धनाथ सावंत, सुमित चंद्रकांत जाधव (सर्व रा. गोरेगाव वांगी) यांचा समावेश आहे.