कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ढेबेवाडी खोऱ्यातील निवि कसणी, घोटीलसह 25 होऊन अधिक दुर्गम भागातील गावांना व वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी- महाईंगडेवाडी येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या मार्गावरील पूल उध्वस्त झाला होता, त्यानंतर भराव भरून वाहतूक सुरू होती. परंतु हा भरावही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने आता वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याने नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसात पुलावरून पाणी जावून पुलाचा भराव वाहून गेला. त्यामुळे आता दळणवळण ठप्प झाले आहे. या प्रकारामुळे कसणी, घोटील, निगडे, महेंगडेवाडी आदींसह वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला असून एसटी सेवा बंद झाली आहे.
कसणीचे सरपंच महेंद्र गायकवाड व काही ग्रामस्थ पुलाजवळ थांबून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहन चालकांना पाण्यात न उतरण्याबाबत सूचना करत होते. सदर पूल व्यवस्थित रहावा यासाठी ग्रामस्थांनी दोन-तीन दिवस मेहनत घेऊन उपाययोजना केल्या होत्या. मात्र त्यांच्या सर्व उपाययोजनावर आज पावसाचे पाणी फिरले आहे. या पुलाचे बांधकाम लवकर सुरू केल्याशिवाय आमचा वनवास संपणार नाही, असे सरपंच महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.