“प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रजासत्ताक दिन विशेष | अप्पा अनारसे

पार्श्वभूमी

९० वर्षापूर्वी म्हणजे १९२९ साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. काय योगायोग आहे बघा? सध्या सगळीकडेच राष्ट्रवादाचे पिक जोरात आहे. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी, नव्या राष्ट्राचा ठराव मांडला गेला लाहोरला. म्हणजे आजच्या पाकिस्तानात. यात देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला, तो ठराव असा होता, “इंग्रजांनी २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला ‘डोमिनियन स्टेटस’ म्हणजे ‘वसाहतीचे स्वातंत्र्य’ द्यावे या तारखेपर्यंत जर भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य नाही मिळाले तर भारत स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित करेल.”
भारतीयांची ही मागणी इंग्रज सरकारने मान्य केली नाही, आणि येथूनच एका नव्या स्वराज्य लढ्याला सुरुवात झाली. २६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे ! या मागणीने जोर धरला. आणि हा दिवस देशभर ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला गेला. या आंदोलनाला लोकांचा जोरदार पाठिंबा मिळू लागला. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा २६ जानेवारी दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी. यानंतर आपण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करू लागलो. एका बाजूला स्वातंत्र्य मिळाले असले तरी राज्यघटना तयार झाली नव्हती. राज्यघटना तयार करण्याचे मोठे काम एकीकडे चालू होते. याकामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. घटना तयार व्हायला २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपली घटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संविधान सभेत घटनेतल्या प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत आणि बारकाईने चर्चा होत असे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार झाली. २४ जानेवारी १९५० साली राज्यघटना समितीतल्या सदस्यांच्या त्यावर सह्या झाल्या.
स्वातंत्र्य लढ्यातील २६ जानेवारी या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व लक्षात रहावे त्यामुळे २६ जानेवारी १९५० या दिवशी राज्यघटना देशभर लागू करण्यात आली.
राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला थोडक्यात घटनेचा आत्मा म्हणता येईल. “आम्ही भारताचे लोक…” अशी प्रस्ताविकेची सुरुवात बरच काही सांगून जाते.
आणि शेवट ही घटना “आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत.” हे फार महत्त्वाचं वाक्य आहे.
आपली समाजवादी, धर्मनिरपेक्ष, जगातील सर्वात मोठी लोकशाही या संविधानावर उभी आहे.
शेवटी ती आपण कोणत्याही देवाला, धर्माला किंवा कोणत्याही महापुरुषाला अर्पण न करता स्वतःला अर्पण केली आहे. यातूनच राज्यघटनेचे महत्त्व लक्षात येते.

देश प्रगती करतोय का ?
होय नक्कीच!

राज्यघटना लागू होऊन ६९ वर्षे होत आहेत. १९५० सालचा भारत आणि आजचा भारत बघितला तर खूप मोठा बदल झालेला दिसत आहे. उद्योग वाढले, रस्ते झाले, मोठमोठी धरणे झाली, आयआयटी, आयआयएम या सारख्या शिक्षण संस्था तसेच इस्रो सारख्या अंतराळ संशोधन संस्था आपण उभ्या केल्या.
एवढं असूनही आपल्याला विकासाचा पाहिजे तसा वेग वाढवता आलेला दिसत नाही.
भौगोलिक दृष्ट्या आपला देश प्रचंड मोठा आहे. लोकसंख्या ही भरपूर आहे. यांचे नियोजन करणे अवघड असलं तरी अशक्य नाही. या सर्वांमध्ये विकासाला अडथळा दिसतो ते म्हणजे आळशी प्रशासन आणि भ्रष्टाचार. या व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता तसा झालेला दिसत नाही. यामुळेच असेल कदाचित शेती सारखी महत्त्वाचे क्षेत्र विकासाच्या टप्प्यातून मागे पडताना दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत

देशात एका बाजूला विकास दिसेल, प्रगती झालेली वाटेल पण हे पूर्णसत्य नाही. कारण एका बाजूला शेतीचे ‘भिकारीकरण’ झालेले दिसते. याला नक्कीच सरकारी धोरणे जबाबदार आहेत.
आज पर्यंत ३ लाख १० हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महाराष्ट्राचा मोठा अाकडा आहे. मराठवाडा ही शेतकऱ्यांसाठी ‘स्मशानभूमी’ झाली आहे.
एकीकडे भांडवलदारांना कमी पैशात मजूर आवश्यक असतात. यासाठी शेतीचे पद्धतशीरपणे भिकारीकरण केले जात आहे. भांडवलदारांच्या दबावामुळे सरकार जाणीवपूर्वक शेतीत गुंतवणूक करत नाही. याचा भयानक परिणाम शेतकऱ्यांच्या जगण्यावर आणि शेतीच्या उत्पादनावर होत आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती हा कायमस्वरूपी उपाय नाही. पण शेतकऱ्यांची सध्याची अवस्था म्हणजे, त्याच्या नरडीला फास लागला असल्यामुळे ‘कर्जमुक्तीचं सलाईन’ देणं गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना काय पाहिजे ?

१) उत्पादित शेतमालाला हमीभाव
२) मुलांचे मोफत शिक्षण
३) कुटुंबाची योग्य आरोग्य व्यवस्था आणि सोयीची
या महत्त्वाच्या गरजा तातडीने उपलब्ध केल्या तर आत्महत्या कदाचित थांबतील सुद्धा.

आजचा तरुण

आजच्या तरुणांवर जुनी पिढी नेहमी टीका करत असते. तसं बघायला गेलं तर प्रत्येक जुनी पिढी नव्या पिढीला नाव ठेवत असते. तरुण वाचत नाही, त्याला सामाजिक भान नाही, चंगळवादी आहे इत्यादी अनेक.
आजचा तरुण जबाबदारचं आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळेल. त्याला जातीची, धर्माची बंधने नाहीत आवडत, राजकारणासाठी दंगली नाहीत आवडत. त्याला मंदिर – मज्जीद या गोष्टींवर राजकारण केलेले नाही आवडत. तो स्वप्न पाहतोय विकासाचं. भलेही विकासाच्या नावाखाली गंडवलं जात आहे हे माहीत असूनही त्याला जाती धर्माची बंधने नको वाटतात. त्याला सामाजिक भानही आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार म्हणून तो रस्त्यावर येऊ पाहतोय ! आजचा तरुण या भ्रष्ट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागलाय. हे सळसळत्या रक्ताचं आणि धडधडत्या हृदयाचं लक्षण आहे.
आपला देश तरुणांचा आहे. राजकारण बदलविण्याची ताकद निश्चितच तरुणांमध्ये आहे. धर्मांध राजकारणी मंडळी धर्माचा, जातीचा, खोट्या राष्ट्रवादाचा, द्वेषाचा सापळा टाकून तरुणांभोवती बसली आहेत. पण तरुणांशी बोलल्या नंतर वाटत नाही की, आजचा तरुण असल्या फालतू सापळ्यात अडकेल म्हणून. कारण तो आता विचार करू लागलाय…

(लेखक ‘युक्रांद’ या सामाजिक आणि राजकीय संघटनेचे सहकार्यवाह असून, राजकारणाचे अभ्यासक आहेत.)

संपर्क:- ९०९६५५४४१९

[email protected]

Leave a Comment