हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे.
युक्रेनची राजधानी कीवला रशियन सैन्याने वेढा दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटीतील देश आता युक्रेनच्या मदतीला धावत असून या देशांकडून मदत लागली आहे. नेदरलँडने युक्रेनला 200 अँटि-एअर क्षेपणास्त्रे दिली आहेत. दुसरीकडे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी “हे युद्ध आता दीर्घकाळ चालेल”, असा गंभीर इशारा दिला आहे.
अमेरिकेने युक्रेनला तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार अमेिरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांना युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी तात्काळ $350 दशलक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर ही मदत जाहीर करण्यात आली आहे.