औरंगाबाद | सामाजिक कार्यकर्ता विजया अवस्ती यांच्या घरात शनिवारी संध्याकाळी चोरी झाली आहे. मुलाकडे राहण्यासाठी गेलेल्या वृद्ध दांपत्याचे धावणी मोहल्ल्यातील जुन्या वाड्यातून 28 तोळे सोने चोरीला गेले आहे.
विजया अवस्ती यांचे सासू सासरे 14 ते 26 मार्च या कालावधीत देवानगरी येथे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा धावणी मोहल्ला येथे आले असता, 9 जून रोजी त्यांनी सहज कपाट उघडले, तेव्हा त्यांना लॉकर उघडे दिसले. त्यांनी कपाट तपासले असता सर्व दागिने चोरी झाल्याचे आढळले. खास करून घरातील इतर ठिकाणी ठेवलेले दागिने मात्र चोरांच्या हाती लागले नाही.
देवा नगरीत राहणाऱ्या विजया अवस्ती यांच्या सासू-सासऱ्यांचा धावणी मोहल्ला येथे जुना वाडा आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावर सासरे जनादर्न अवस्ती आणि त्यांच्या पत्नी निनादेवी राहतात. तसेच तळमजल्यावर चुलत नातेवाईक राहतात. दोघेही बऱ्याच वेळा देवानगरी येथे मुलाकडे राहण्यासाठी जात असतात. सिटी चौक पोलिस ठाण्यात शनिवारी या प्रकरणी विजया अवस्ती यांनी तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.