सातारा | मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल तिन्ही अर्ज छाननीत पात्र ठरल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल पवार यांनी दिली. नगरपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता असताना नगराध्यक्षापदासाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांची मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग बळवंत जवळ यांनी दोन व पांडुरंग दामोदर देशपांडे यांनी एक असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल झालेले तिन्ही अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.
सोमवारी पांडुरंग जवळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पांडुरंग देशपांडे यांनी अर्ज भरल्यामुळे मेढा शहरात चर्चेला उधाण आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पांडुरंग जवळ यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते, असे सांगित त्याप्रमाणे त्यांनी अर्ज भरला. मात्र, त्यानंतर पांडुरंग देशपांडे यांनीही अर्ज भरला आहे.
उद्या गुरूवारी (ता. 22 एप्रिल) सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज माघारी घ्यायची मुदत असून, गरज पडल्यास 23 तारखेला मतदान होईल. उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी 23 ला सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्याची छाननी लगेच होणार असून, त्यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ असेल व गरज पडल्यास मतदान प्रक्रिया पार पडेल.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा