सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना नंतर आता स्वाईन फ्लू ने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेने चार दिवसांमध्ये 7 संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबला पाठवले होते. त्यामध्ये तिघांना स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले असल्याने सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
कोरोनाची चौथी लाट ओसरली नसतानाच स्वाईन फ्लूची जिल्ह्यात एन्ट्री झाल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य रोगांची वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील आरफळ, महाबळेश्वर आणि मुंबई येथील एका रुग्णाचा समावेश आहे. स्वाईनचे रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना दिल्या आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे आणि वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लक्षणे आढळल्यास तपासणी करा : डाॅ. सुभाष चव्हाण
विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात औषधे आणि यंत्रणा सज्ज झाली आहे. रुग्णांनी गर्दीमध्ये जाणे टाळावे, शिंकताना खोकताना रुमाल वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा, ताप खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकीचक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.