रेशनिंग धान्य दुकानदारांचा 3 दिवस देशव्यापी संप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्यामार्फत पुकारलेल्या देशभरातील आंदोलनात सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक संघटना सहभागी होणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी दि. 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला रेशनिंग धान्य दुकाने बंद राहणार आहेत.

आगामी 3 दिवसाच्या आंदोलनाची शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील महिन्यात 22 मार्च रोजी रामलीला मैदान नवी दिल्ली येथून संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. रास्त भाव धान्य दुकानदार यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा स्वस्त धान्य रेशन दुकान जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अकरा तालुका अध्यक्षांची उपस्थिती होती.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या काय आहेत मागण्या ः-
1) गेल्या 13 ते 14 महिन्यांचं रेशन धान्य दुकानदारांचं मोफत धान्य वाटपाचं कमिशन मिळावे.
2) सर्व्हर प्रॉब्लेममुळे पॉज मशीन बंद पडत असल्याने धान्यवाटप मशीन बंद राहते. त्यामुळे दुकानदार व ग्राहक यांचे वादावादीचे प्रसंग घडतात. तेव्हा सर्व्हरची समस्या सोडवावी.
3) शासनाचे ज्या वाहनातून धान्य येईल, त्या वाहनात वजन काटा असावा. कारण शासनाकडून येणाऱ्या धान्याच्या वजनात तफावत आढळत आहे.
4) जानेवारी 2023 पासून केवळ मोफत धान्य वाटप असल्यामुळे दुकानदारांना जे कमिशन मिळणार आहे, ते दर महिन्याला 5 तारखेपर्यंत जमा करावे.
5) आता जे कमिशन मिळते ते तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करावी. आत्ता एका पोत्याला क्विंटलसाठी 150 रुपये कमिशन मिळते ते 350 ते 400 रुपये मिळावे. या सर्व मागण्यासाठी राज्यभरात संघटनेकडून 3 दिवसासाठी स्वस्त धान्य वाटप पूर्णपणे बंद राहणार आहे.