कराड | सातारा व सांगली जिल्ह्यातील दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. या संशयित आरोपीकडून पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इब्राहिम अब्बास अल्ली शेख (वय – 23, रा. सुर्यवंशी मळा, कराड सध्या रा. गोटे ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार (ता. कराड) गावचे हद्दीत कालवडे रोडकडेला संदिप वसंत देसाई (रा. वाठार -कालवडे रस्ता ता. कराड,जि.सातारा) यांचे बंद घराचे कुलुप अज्ञात चोरट्याने कशानेतरी तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे कुलुप काढुन त्यातील कपडे, कागदपत्रे व साहित्य विस्कटुन कपाटातील पर्समध्ये ठेवले सोन्याची कानातील टॉप्स व चांदीचे ब्रेसलेट चोरीस गेले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांचे सुचनानुसार कराड तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो. ना. सज्जन जगताप, पो. हवा. उत्तम कोळी हे दि. 17.08.2022 रोजी रात्रो 09.00 वाजणेचे सुमारास पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती व संशयीत आरोपीचे वर्णन मिळाले त्यावरुन माहितीच्या अधारे एक संशयीत इसम हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकलवरुन फिरत आहे. त्यावरुन त्यास पाठलाग करुन पकडले असता, त्यास त्याचे नांव, गाव, विचारुन त्याची झडती घेण्यात आली. संशयितांच्या खिशात सदर घरफोडीतील चोरीस गेले वर्णनाप्रमाणे चांदीचे ब्रेसलेट मिळून आले. त्यास मोटार सायकलसह पोलीस स्टेशनला आणुन अधिक विचारपुस केली असता. त्याने वाठार (ता. कराड) येथील घरफोडी केलेचे कबुल केले. त्यासोबत 15 दिवसापुर्वी उंब्रज येथे दिवसा घरफोडी व कासेगाव येथेही दिवसा घरफोडी केलेचे कबुल केले. वाठार येथील संदिप वसंत देसाई यांचे घरफोडीतील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, उंब्रज पोलीस ठाण्या अंतर्गत सुरेश परशराम माने (रा. चरेगाव ता. कराड) यांचे 27 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व 1 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व कासेगाव पोलीस स्टेशन दाखल तक्रारीतील सचिन बबन निकम (रा. कासेगाव ता. वाळवा जि.सांगली) यांचे घरातुन चोरीस गेलेले 10 ग्रॅम वजनाची बोरमाळ व 3 ग्रॅम वजनाचे दोन वाट्या असलेले मणीमंगळसूत्र असे एकुण 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करुन पंचनामा करुन जात करण्यात आला आहे.
संशयित आरोपीकडून 3 दिवसा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण 48 ग्रॅम सोन्याचे व 300 ग्रॅम चांदीचे दागिने किंमत रुपये 2 लाख 66 हजार 600 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव हे करीत आहेत. सदरची कारवाई कराड तालुका पोलीस स्टेशन पोउनि आशिष जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो. ना. सज्जन जगताप, पो. हवा. उत्तम कोळी, पो. का. अमोल पवार यांनी केली.