जुन्नर मधील माणिकडोह धरणामध्ये तीन तरुणांचा बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जुन्नर प्रतिनिधी | सतिश शिंदे

माणिकडोह धरणात आज तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिक मासेमारांकडुन मासे विकत आणण्यासाठी गेलेल्या ७ जण व बोटचालक हे बोट उलटल्याने पाण्यात पडल्याने सदर दुर्घटना झाली. त्यापैकी ४ तरुण पोहून बाहेर आले. बोटचालक पाण्यात गटांगळ्या खात असताना त्याला स्थानिक मच्छीमारांची वाचवले. परंतु तीन तरुण गणेश भाऊ साबळे, स्वप्नील बाळू साबळे व पंढरी मारुती उंडे धरणात बुडाले.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेवुनही मृतदेह न सापडल्याने पुण्यावरून एनडिआरएफ च्या टिमला पाचारण करण्यात आले. दुपारी अडीचच्या दरम्यान एनडिआरएफ टिम घटनास्थळी पोहचून पानबुड्यामार्फत तीनही मृतदेह शोधून काढण्यात यश आले. स्थानिक पोलीसांना माहिती देवुनही पोलीस तब्बल पाच तासाने आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. सदर परिसरात मोबाईल नेटवर्क तसेच चांगले रस्ते नसल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.

जुन्नर तालुक्यातील जलाशयांत अशा घटना वरचेवर घडत असतात. तसेच गिर्यारोहकांचे देखिल अपघात होत असतात. धरण परिसरातील सुरक्षिततेसाठी अद्ययावत स्पीड बोटींसह जलरक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. तसेच मोबाईल टॉवर सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाला आहे पण दमडीचाही निधि आलेला नाही. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देवुन जलसुरक्षक व दुर्ग सुरक्षक म्हणून नेमणूक केल्यास पर्यटक व ग्रामस्थांचे जीव वाचू शकतात व स्थानिक तरुणांना देखिल रोजगार मिळू शकेल.